Diwali Information In Marathi 2022 | दिवाळी सणाची माहिती | दिवाळीचे महत्त्व, फायदे आणि नुकसान
Table Of Content
Diwali Information In Marathi
Diwali Information In Marathi:-दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात. हा सण साधारणपणे ऑक्टोबर – नोव्हेंबर दरम्यान येत असतो. या सणाला भारतात बव्हंश ठिकाणी सुटी असते. हा एक पवित्र हिंदु सण आहे जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक आहे.
लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले. तो याच दिवसात. पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात. यामागची परंपरा कशी व केव्हा सुरू झाली याची नोंद नाही.
दिवाळीतील ५ दिवसांचे महत्त्व/माहिती(Diwali Information In Marathi)
वसुबारस माहिती मराठी(Vasu Baras Information In Marathi)

वसुबारस माहिती: 21 ऑक्टोबर शुक्रवार- आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात.
घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा असते.
धनत्रयोदशी माहिती मराठी(Dhantrayodashi Information in Marathi)

धनतेरस माहिती: 22 ऑक्टोबर शनिवार- आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते.
जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात. या कारणास्तव, यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका आहे. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.
धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो असे म्हटले आहे.
आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची (देवांचा वैद्य) पूजा करतात. लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. (याला तेलुगूमध्ये गुडोदकम् म्हणतात.) यात मोठा अर्थ आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही, असे काहीजणांची समजूत आहे. कडुनिंबाचे एवढे महत्त्व आहे, म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.
या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर,विष्णू -लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात.
हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो.
जैनधर्मीय या दिवसाला ‘धन्य तेरस’ वा ‘ध्यान तेरस’ म्हणतात. भगवान महावीर या दिवशी ३ऱ्या व ४थ्या ध्यानात जाण्यासाठी योगनिद्रेत गेले होते. तीन दिवसाच्या योगनिद्रेनंतर त्यांना दिवाळीच्या दिवशी निर्वाणप्राप्ती झाली. तेव्हापासून हा दिवस धन्य तेरस या नावाने प्रसिद्ध झाला.
नरक चतुर्दशी माहिती मराठी(Narak Chaturdashi Information in Marathi)

नरक चतुर्दशी माहिती मराठी: 24 ऑक्टोबर सोमवार- नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा – म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही – असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले.
त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली.
कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे.
तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान. या दिवशी पहाटे यमासाठी नरकात, म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे.
वर्षक्रियाकौमुदी, धर्मसिंधु इ. ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेऊन त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी.
नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते, तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्नादिवशी उडवून संपवतात.
लक्ष्मीपूजन माहिती मराठी(Lakshmipujan Information Marathi)

लक्ष्मीपूजन माहिती: 24 ऑक्टोबर सोमवार- आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते.या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे.त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला भेंड, बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात.
या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.केरसुणीने घर स्वच्छ होवून घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्य्र दूर होते असे मानले जाते.
प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. भारतात, विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिस्थापित केले गेले.
अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निर्ऋती या नावांनीही ओळखतात. निर्ऋती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत.
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती ‘ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, ही या पूजेची विशेषता आहे. भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवल ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर त्यांचा दिव्य-ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला ‘मांडणे’ असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात.
बलिप्रतिपदा माहिती मराठी(Diwali Padwa Information Marathi)
बलिप्रतिपदा माहिती: 26 ऑक्टोबर बुधवार- कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो.हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात, या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला “शुभा” असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे.
आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो.
नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच “दिवाळसण” म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी – बैलांना रंग लावून रंग लावून व माळा लावून सजवतात. पाताणे प्रभू (पाठारे प्रभू) लोकांत बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.
गोवर्धन पूजा माहिती मराठी(Govardhan Puja Information In Marathi)
गोवर्धन पूजा: मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.
भाऊबीज माहिती मराठी(Bhaubeej Information In Marathi)
भाऊबीज माहिती: 26 ऑक्टोबर बुधवार- कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला “यमद्वितीया” असे नाव मिळाले असे मानले जाते. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो. भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच.
भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरा करतात.
दिवाळीचे फायदे:(Benefits of Diwali In Marathi)
- सर्व लहान -मोठ्या व्यावसायिकांसाठी हा काळ विशेष कमाईचा आहे.
- दिवाळीमुळे सर्व प्रकारच्या व्यवसायांना चालना मिळते कारण या सणात सर्व काही नवीन येते. लोक घराची सजावट, त्यांचे कपडे, दागिने, खाण्यापिण्यावर सर्वकाही खर्च करतात.
- परस्पर प्रेम दिवाळीत वाढते, ज्यामुळे नात्यात गोडवा येतो.
- स्वच्छतेचे खूप महत्त्व आहे, ज्यामुळे घरे आणि आसपासचे वातावरण स्वच्छ आहे, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या सणाच्या निमित्ताने वर्षातून एकदा संपूर्ण घर स्वच्छ केले जाते, त्यांना नवीन रंग दिला जातो. जर हा सण नसेल तर ते होणे कठीण आहे.
- दिवाळी सण कुटीर उद्योगांसाठीही आनंद घेऊन येतो. चिकणमातीसारखी, फर्निचर कुटीर उद्योगाद्वारे बनविली जातात, ज्यातून ते आपला उदरनिर्वाह करतात.
दिवाळीचे तोटे,नुकसान:(Disadvantages of Diwali In Marathi)
- फटाक्यांमुळे प्रदूषण पसरते.
- दिव्यांमध्ये तेल जळतो.
- जास्त मिठाई आणि डिश आरोग्याला बिघडवतात.
- लाइट सजावट केल्यामुळे विद्युत ऊर्जा वाया जाते.
- सांडपाणी सांडले जाते.
- लोक शो ऑफच्या बाबतीत अवाजवी खर्च करतात.
Source :- mr.wiki
हे आवश्य पहा:- दिवाळीच्या शुभेच्छा संदेश 2021
आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा Diwali Information In Marathi/दिवाळी सणाची सर्व माहिती, मिळाली असेल. आपण हि पोस्ट Diwali Information 2022 मित्रांना शेअर करू शकता.
आमच्या इतरही पोस्ट वाचा. HOME ला भेट द्या.
FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न)
प्रश्न: दिवाळी का साजरी केली जाते?
उत्तर: माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे, हिंदू धर्म आणि शास्त्रानुसार असे म्हटले जाते की समुद्र मंथन दरम्यान कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी समुद्र मंथन करताना माता लक्ष्मीचा जन्म झाला. म्हणूनच देवी लक्ष्मीचा जन्मदिवस दिवाळीच्या दिवशी साजरा केला जातो आणि तिची पूजा केली जाते.
Nice information . Thank you 👍